Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण...; शरद पवार यांची जोरदार टीका

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण…; शरद पवार यांची जोरदार टीका

मुंबई l Mumbai

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याविरोधात मुंबई येथील आझाद मैदानात राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोर्चा (Farmers Protest) काढला आहे. या मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांन पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आझाद मैदानात आले होते. या वेळी शेतकऱ्यांना संबोधित करतांना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, ‘तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.’

तसेच, ‘राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं.’ असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

चर्चेचे सर्व दरवाजे उघडे असताना केंद्र सरकारने कृषी कायद्यांबात कोणतीही चर्चा केली नाही. संसदेत कृषी कायद्यावर चर्चा करण्याची विरोधक आणि खासदारांची इच्छा असताना केंद्र सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. घटनेची पायमल्ली करत सरकारने ठरवल्याप्रमाणे जसेच्या तसे हे कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्थ करतो तो समाजकारणातून उद्ध्वस्त होतो, असा इशाराही शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात आलो आहे असे सांगत शरद पवार यांनी भाषणास सुरुवात केली. गेली 60 दिवस थंडी, उन, वारा, पाऊस असा कोणताही विचार न करता शेतकरी आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत उभा आहे. या आंदोलनात राज्यातीलही हजारो शेतकरी सहभागी आहेत. मात्र पंतप्रधान या शेतकऱ्यांना भेटायला गेला क? असा सवालही शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आहोत, असेही पवार या वेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या