यावल नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार

दि.14 जुलै रोजी होणार निवड
यावल नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार

यावल - प्रतिनिधी

यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती सुरेखा शरद कोळी या अपात्र ठरल्याने त्यांच्या रिक्त जागी दि.14 जुलै रोजी निवडणूक होणार असून पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी फैजपूर हे राहणार असून सकाळी 11 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती सुरेखा कोळी या दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून अपात्र ठरविले होते. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर पालिकेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांचेकडे दि.9 डिसेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला होता आता मात्र नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे दि.30 जूनच्या पत्रानुसार लोकनियुक्त नगराध्यक्ष अपात्र ठरविल्याने यावल नगर परिषद अध्यक्षपदाची निवड करणे आवश्यक आहे.

तसेच महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम 2009 शासन राजपत्र विधेयक दि.14 मार्च 2020 नुसार यावल नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात आले आहे. अधिनियमाच्या कलम 51(1) व 51-1 अ च्या तरतुदीनुसार निवडून आलेल्या पालिका सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे व सदरचे पद हे अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एकमेव सदस्य श्रीमती नौशाद तडवी असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्या निवडीसाठीची पालिका सदस्यांची विशेष सभा दिनांक 14 जुलै 2020 रोजी सकाळी अकरा वाजता फैजपुर विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन स्वीकारण्याची दिनांक सहा जुलै ते सात जुलै अशी असून त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी तसेच उमेदवारी मागे घेणे इ.बाबत कार्यक्रम जाहीर झाला असून तसे पत्र पालिकेच्या सर्व सदस्यांना प्राप्त झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com