लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे - नाना पटोले

लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे - नाना पटोले

पुणे (प्रतिनिधी) - देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने या देशाच्या दुश्मन देशाला फुकट लस दिली परंतु, जनतेकडून पैसे घेत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

शनिवारी (दि. 24 एप्रिल) नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पुण्याच्या विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस मोफत देण्याचे निवेदन दिले त्यानंतर ते बोलत होते.

पटोले म्हणाले, दर शंभर वर्षांनी कोरोना सारखी महामारी जगामध्ये येते. 1920 मध्ये स्पॅस्निश फ्ल्यू नावाचा आजार आला होता. त्यावेळी इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांनी सुद्धा मोफत लसीकरण केले होते. त्यानंतर अनेक महामाऱ्या देशांमध्ये आल्या. पोलिओ सारख्या आजाराच्या लसीचे डोस मोफत आपण चौकाचौकात दिले. त्यामुळे कोविड महामारीच्या काळात केंद्राने देशाची जनता आपली आहे असे समजून सर्वांना सर्वांना मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.

देशातील सर्वांना लसीकरण केले असते तर लोकांचे जीव वाचवता आले असते आणि ऑक्सिजन रेमडेसीविर सारख्या इंजेक्शनच्या काळ्याबाजारापासून पासून जनतेला वाचवता आले असते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या देशाची अधोगती होत आहे.

ब्रिटनची लोकसंख्या साडेसात ते आठ कोटी आहे त्या ब्रिटनने चाळीस कोटी लसींची ऑर्डर दिली होती. ब्रिटनने संपूर्ण देशाचे लसीकरण केले, जगाच्या पाठीवरच्या सर्व देशांनी लसीकरणाचेचे नियोजन केले ते भारताला का करता आले नाही असा सवाल करून आपल्या देशात लसीची निर्मिती झाली. आता सरकारी रुग्णाला चारशे रुपये व खाजगी रुग्णालयांना सहाशे रुपये दर ठरविण्यात आला आहे. कोरोना लसींच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्याचवेळी पाकिस्तानला आम्ही फुकट लस दिली. जो या देशाचा दुश्मन आहे त्याला फुकट लस दिली जाते मग देशातल्या जनतेला तुम्हाला जर मोफत लस देता येत नसेल आणि त्यांचा जीव जात असतील तर आपण कुठल्या पातळीवर चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील जनतेला मोफत लस मिळावी अशी आम्ही मागणी केली आहे. लस निर्मिती कंपन्यांना केंद्र सरकारने ॲडव्हान्स पैसे दिले आहेत. हे पैसे जनतेच्या कामाचे पैसे आहेत, कोणाच्या घरचे पैसे नाही. देशभरातील जनतेला मोफत लस द्यावी असं केंद्र सरकारला आज विभागीय आयुक्तांमार्फत पत्र दिले आहे असे त्यांनी सांगितले.

पटोले म्हणाले, ज्या देशात ७० ते ८० टक्के लसीकरण झाले आहे, ते देश कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच तेथील लॉकडाऊनही संपला आणि लोकांचे जीव वाचले. आपल्या देशाच्या प्रमुखांनी देशातील कोविडचे नियोजन त्या पद्धतीने केले असते तर आज निरपराध लोकांचे जीव वाचऊ शकलो असतो. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी भारतामधून कोविड संपलेला आहे असे जाहीर केले. त्यामुळे देशातील राज्यांनी गेल्यावर्षी कोविडसाठी जी तयारी केली होती ती कोविड सेंटर त्यांनी काढून टाकले. कोट्यावधी रुपये त्यामध्ये खर्च झाले. आज देशात जी मोठी लाट आली आहे. त्यामध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. सर्वात मोठी समस्या ऑक्सिजनची आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजनअभावी २६ लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये ही परिस्थिती असेल तर देशभरातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणजेच या सर्वाचे मूळ ज्यामध्ये आहे ते म्हणजे देशात सर्वांचे लसीकरण झाले असते तर लोकांचा जीव वाचवता आला असता.

राज्याने काही नियोजन का केले नाही, कोविशिल्ड लसची निर्मिती करणारे पूनावाला हे शरद पवार यांचे मित्र आहे. ते त्यांच्याशी बोलू शकतात याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, गेल्यावर्षी या महामारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामारी म्हणून घोषित केले. ही राष्ट्रीय महामारी आहे म्हटल्यावर त्याचे नियोजन केंद्राने करायला पाहिजे. अशा महामारीमध्ये देशाच्या जनतेच्या जीविताचे रक्षण करणे ही केंद्राची जबाबदारी असते. केंद्र म्हणजे फक्त दिल्लीतले लोक नसतात सर्व राज्यातले लोक मिळून केंद्र सरकार बनलेले असते. त्यामुळे भेदभाव सरकारला करता येणार नाही. परंतु, संविधानाच्या बाहेर जाऊन जी हुकूमशाही निर्माण झाली आहे, त्याचा परिणाम आपला देश बघतो आहे असे सांगून पटोले म्हणाले, दोष कोणाचा याचा विचार करण्याची ही वेळ नाही. राजकारण करण्याचीही ही वेळ नाही. सोनिया गांधी राहुल गांधी यांनी कोरोनाची साथ आपल्या देशात येण्या अगोदर अनेक वेळा विनंती आणि सूचना केल्या होत्या, परंतु त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन भाजपच्या भाडोत्री लोकांनी त्यांची टिंगल केली. पण आज आपण बघतो आहे, लोकांचा जीव जात आहे ,त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला. त्यावेळी काँग्रेस नेत्यांचे म्हणणे केंद्र सरकारने ऐकले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ आली नसती हा मूळ प्रश्न आहे. पूनावाला शरद पवारांचे मित्र आहे आहे की काय या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. अशा महामारीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा समन्वय करून तशा पद्धतीचे धोरण केंद्र सरकारने राबवणे गरजेचे असते. ही महामारी किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे ती केवळ महाराष्ट्रात नाही. गुजरात, उत्तर प्रदेश हे राज्य स्मशानभूमी झाले आहेत. सगळे आकडे इतर राज्यात लपविले जातात. महाराष्ट्रात कुठलेही आकडे लपवले जात नाहीत. संपूर्ण वस्तुस्थिती मांडली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे हे दाखविले जाते, हे चुकीचे आहे असेही पटोले म्हणाले.

केंद्राकडून आणि बाकीच्या राज्यांकडून ऑक्सीजन मिळवण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. परंतु, केंद्र सरकारने हे अगोदरच अवगत करायला पाहिजे होतं. आता पंधरा दिवसांची मोठी लाट येणार आहे. त्यावेळी रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. समजा हे प्रमाण वाढले तर जो ऑक्सिजन आता येतो आहे, तोही तुटपुंजा पडणार आहे, अशी भीती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले गेले हे बघितल्यानंतर मोठ्या पापाची रचना करून ठेवली गेली होती असेच म्हणावे लागेल असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा या आवाहनाबद्दल बोलताना पटोले म्हणाले, “लसीचे दर ठरवण्यापूर्वी आम्ही सांगितले होते की सरकारने लसीकरण केले तर पुढच्या वेळी लॉकडाऊन करावा लागणार नाही. सर्व राज्यांमध्ये लसीकरण करावे अशी विनंती काँग्रेसने केली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडली जात आहे. लोकांमध्ये आता जागृती झाली आहे. जेव्हा लोकांमध्ये जागृती होते, तेव्हा कोरोना सारखे आजाराला प्रतिबंध करण्यात आपण यशस्वी होतो असा आमचा विश्वास आहे. कोरोनाची ही साखळी तुटली तर महिनाअखेरपर्यंत कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठीचा हा प्रयोग

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने केलेल्या अटकेबद्दल बोलताना पटोले म्हणाले, मूळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी केलेला हा एक प्रयोग आहे .परंतु , ही ती वेळ नाही. सामान्य निरपराध लोकांचे जीव वाचवणं हे आमचं दायित्व आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com