
मुंबई | Mumbai
राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद हा काही नवा नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगल्याचा पहायला मिळत असतो.
त्यातच आता “नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे”, असा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या वक्तव्यामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
येत्या दोन महिन्यात नारायण राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केलाय. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळं राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हंटलं आहे.
त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. वैभव नाईक यांच्या या विधानावर भाजपकडून किंवा नितेश राणे, निलेश राणे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
यावेळी ईडीच्या चौकश्यांवरून त्यांनी टीका केली. नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. कारण शिंदे गटाच्या लोकांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.