
मुंबई | Mumbai
आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेतला जात आहे. लोकसभेसाठी कोणाला सधी मिळणार याची इच्छूक नेत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनीही आज दक्षिण मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली. या जागेवरुन अरविंद सावंत यांना तिकीट दिले जाणार आहे. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राखली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. सावंत यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
लोकसभा मतदारसंघाचा आढावा मागील काही दिवसापासून ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे. यातच आता मुंबईतील एक एक मतदारसंघासाठी उमेदवार निवडीचा पर्याय शोधला जात आहे. यातच आता दक्षिण मुंबईतून खासदार असलेल्या अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभेचा मोठा तिढा निर्माण झाला आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सध्या गजानन किर्तीकर खासदार असून ते शिंदे गटात आहे. तर गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात पिता विरूद्ध पुत्र असा राजकीय सामना बघायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.