
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, तर जम्मू-काश्मिरात आंतकवादी हल्ले सुरू आहेत. असं असतानाही भाजपा पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात गुंतले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. कश्मीरातील हिंसाचाराकडे, महाराष्ट्र, मणिपूरच्या आंदोलनाकडे बेफिकिरीने पाहणाऱ्या सरकारला देशाच्या मातीचे मोल काय कळणार? असा सवाल सामनाच्या (Samna Editorial) अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
अतिरेक्यांचे दुस्साहस कश्मीर खोऱ्यात वाढले आहे. गेल्या चार महिन्यांत पंचवीसपेक्षा जास्त लष्करी अधिकाऱ्यांना अतिरेक्यांकडून प्राण गमवावे लागले. केरळात बॉम्बस्फोट झाला. त्यात दोन ठार व ५० जण जखमी झाले. केरळात भाजपाचे सरकार नाही. त्यामुळे भाजपाने केरळातील दहशतवादी हल्ल्यावर थयथयाट केला आहे, पण हेच लोक मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रावर बोलत नाहीत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडले असताना तिकडे जम्मू-कश्मीरात रक्तपात, हिंसाचार, हत्यासत्राचा उद्रेक झाला आहे. २४ तासांत तिसरा आतंकी हल्ला झाला आहे. श्रीनगरमध्ये आपल्या लहान मुलासमवेत क्रिकेट खेळत असलेल्या इन्स्पेक्टर मसरूर अहमद यास अतिरेक्यांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केले. ही बातमी भाजपच्या अंधभक्तांनी नजरअंदाज केलेली दिसते.
मसरूरच्या जागी एखादा महादेव सिंग, यमुना प्रसाद मारला गेला असता तर भाजपने पाकड्यांच्या आतंकवादावर नरडी फाडली असती. मसरूर अहमदच्या हौतात्म्यावरील रक्ताचे शिंपण ताजे असतानाच पुढच्या चोवीस तासांत पुलवामात अतिरेक्यांनी उत्तरेचा मजूर मुकेश कुमार याला ठार केले. मंगळवारी बारामुल्ला जिह्यात गुलाम मोहम्मद दार या पोलिसाची अतिरेक्यांनी हत्या केली. याचा अर्थ असा की, पुन्हा एकदा अतिरेकी बेलगाम सुटले आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
मोदी इस्रायल-हमास युद्धावर चिंता व्यक्त करतात, पण मणिपूर, महाराष्ट्र, जम्मू-कश्मीरातील हिंसाचारावर मौन बाळगतात. गृहमंत्री शहा राजकीय विरोधकांचा भ्रष्टाचार कुदळ-फावडी घेऊन खणून काढतात व तुरुंगात टाकतात, पण देशात अतिरेकी व धर्मांधांना मोकाट सोडतात”, अशी टीकाही यातून करण्यात आली आहे.
पाकिस्तान सीमेपलीकडून संघर्ष विरामाचे रोज उल्लंघन करीत आहे. कश्मीरात अतिरेकी अचानक कोठूनही येतात व अंदाधुंद गोळीबार करून गायब होतात. त्यामुळे सरदार पटेलांना आदर्श मानून काम करणाऱ्या मोदी सरकारचे पोलाद कश्मीरातील बर्फाप्रमाणे वितळून गेले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.