Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील; TET घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील; TET घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

मुंबई | Mumbai

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Scam) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच या गैरप्रकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याच विद्यार्थ्यांच्या यादीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांची नावे असल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या आरोपानंतर अब्दुल सत्तारांना काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खोचक टोला लगावला आहे. आता शिंदे सरकार सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी खपवून जातात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा दिली. पण त्या पात्र झाल्या नाहीत. आज अचानक २०२२ मध्ये यादी समोर आली. या चार वर्षांमध्ये कुठेही मुली पास झाल्या असतील आणि त्याचा फायदा घेतला असेल ते दाखवा. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमची चूक असेल तर माझ्या मुलींवर कारवाई करावी. पण चूक नसेल तर ज्यांनी हे सर्व आरोप केले आहेत, त्याला फासावर लटकवायला पाहिजे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या