सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचं ट्विट; शिंदेंना केलं 'हे' आवाहन

सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचं ट्विट; शिंदेंना केलं 'हे' आवाहन

मुंबई | Mumbai

वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर टाटा एअरबसचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताराधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरू आहेत.

दरम्यान, अशातच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samnat) यांनी मांडलेल्या भूमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सत्य सांगण्याची, मागणी केलीये.

टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे २१ हजार ९३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला."

"या प्रकल्पाच्या माध्यमातून ६ हजार जणांना रोजगार मिळणार होते. काही दिवसांपुर्वीच वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प देखील गुजरातला गेला. हा अगोदर पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होणार होता. सुमारे १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होती", असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

"राज्यातील सुमारे दीड लाख लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार होता. याखेरीज रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला बल्क ड्रग पार्क हा सुमारे पावणेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प देखील गुजरातला गेला. या प्रकल्पातून राज्यातील ८० हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या", असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी मांडला आहे.

"याशिवाय राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देखील मिळणार होता. हे असे एकामागून एक महत्वाचे प्रकल्प गुजरातला जात असताना याच सरकारमधले मंत्री महोदय सातत्याने परस्परविरोधी विधाने करीत आहेत", असं म्हणत सुप्रिया सुळेंनी उद्योगमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

"टाटा एअरबस प्रकल्पाबाबत काही दिवसांपुर्वी ते म्हणाले की माननीय उपमुख्यमंत्री हा प्रकल्प राज्यात थांबविण्यात कमी पडले. त्यानंतर तेच मंत्रीमहोदय हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे एक वर्ष आधीच हा राज्याबाहेर गेल्याचे सांगतात. एका वाहिनीवर महिनाभरापुर्वी हेच मंत्री हा प्रकल्प नागपुरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सांगत होते. थोडक्यात अतिशय महत्वाच्या या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

"राज्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करणारा हा प्रकल्प गुजरातला कसे गेला याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका ठामपणे स्पष्ट करण्याची गरज आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण याबाबतीत जी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत जनतेला सत्य काय ते सांगावं", अशी मागणी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलीये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com