Friday, April 26, 2024
Homeराजकीय‘डॉ. तनपुरे’ कारखान्याचे भवितव्य आज ठरणार ?

‘डॉ. तनपुरे’ कारखान्याचे भवितव्य आज ठरणार ?

उंबरे (वार्ताहर)- आर्थिक चक्रव्युहात सापडलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य आज मंगळवार दि. 30 जून रोजी होणार्‍या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरणार आहे. राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्याच्या साखर वर्तुळाचे या बैठकीकडे वेधले असून यात माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुुळे आता ‘डॉ. तनपुरे’ कारखान्याच्या बाबतीत माजी आ.कर्डिले काय निर्णय घेतात? यावरच डॉ. तनपुरे कारखान्याची दिशा स्पष्ट होणार आहे.

दरम्यान कारखाना चालू होण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राहुरीच्या संचालक मंडळाने अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांच्यासह कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना हा कारखाना चालू करण्याविषयी साकडे घातले होते. तर काल सकाळी नगर दक्षिणचे खा. डॉ.सुजय विखे यांच्यासह कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक व राहुरी तालुक्यातील भाजपचे अध्यक्ष अमोल भनगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी माजीमंत्री आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्‍हाणनगर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली.

- Advertisement -

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉ. तनपुरे कारखाना चालू करण्याबाबत सहकार्य करावे, आज दि. 30 जून रोजी होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्याच्या कर्ज वसुलीस एक वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्तावा संदर्भात बँकेच्या सर्व संचालक मंडळाशी चर्चा करून कारखाना चालू होण्यासाठी योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी, कामगारांच्या व राहुरी तालुक्याच्या हितासाठी कारखाना पूर्ववत चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षी डॉ.तनपुरे गाळपाविना बंद होता. कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत चालल्याने विद्यमान संचालक मंडळाला हा कारखाना चालू करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या कारखान्यावर राहुरी तालुक्यातील व्यापारी पेठ आणि शेतकर्‍यांचे भवितव्य अवलंबून असल्याने जिल्हा बँकेच्या आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या