Saturday, May 11, 2024
Homeराजकीयटाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीची हवा तापू लागली

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीची हवा तापू लागली

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील राजकीय प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हवा तापू लागली आहे.

- Advertisement -

सत्तेचा सोपान गाठण्यासाठी गावपुढारी वरच्या नेत्यांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैयक्तिक बैठका घेऊन विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांचे मन वळवण्यासाठी ओल्या पार्ट्या सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.

तालुक्याला राजकीय दिशा देणार्‍या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाची मुदत 30 ऑगष्ट 2020 रोजी संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकीय सरपंचाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर निवणुका पुढे ढकलल्या गेल्याने गेल्या कित्येक वर्षात प्रथमच निवडणुकीत सत्ताधारी गटाचा हस्तक्षेप असणार नाही. गेल्या काही वर्षांच्या संकेतानुसार मे किंवा जून महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित असल्याने जानेवारी 2020 पासूनच वातावरण तापायला सुरवात झाली होती.

मात्र करोनामुळे निवडणुका लांबल्याने काही महिने वातावरण ठंडा ठंडा कुल कुल झाले होते. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण ही तयारी यापुर्वीच झालेली आहे. सरपंच आरक्षण व अंतिम मतदार यादी बाकीअसली तरी निवडणूक आयोगाने निवडणुका सुरू केल्याने पुन्हा एकदा वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

तालुक्याला राजकीय दिशा देणार्‍या टाकळीभान ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्षे दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या 2015 च्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आमदार जयंतराव ससाणे गटाने युती करून सत्ता काबीज केली होती. माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या रुपाली धुमाळ सलग 5 वर्षे सरपंचपदी विराजमान होत्या.

उभयतांमध्ये अडीच अडीच वर्षाचा सरपंचपदाचा कार्यकाल ठरलेला आसतानाही पवार गटाने या ठरावाला कात्रजचा घाट दाखवल्याने उर्वरीत अडीच वर्षे या उभयतांमध्ये सतत धुसफुस सुरू होती. पवारांनी शब्द न पाळल्याचा राग स्थानिक मुरकुटे गटाच्या डोक्यात असल्यामुळे आगामी निवडणुकीत ही युती पुन्हा होणार नाही याचे संकेत यापुर्वीच मिळत होते.

सत्तेचा सोपान गाठताना मुत्सद्दी पवार यांनी गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकारणात त्यांच्याशी रास न जुळणार्‍या कापसे गटाच्या डॉ. सरोजनी कापसे यांनाही सरपंच पदाचे अमिष दाखवून जिल्हा परिषद निवडणुकीत मतांचा लाभ घेतला होता. मात्र जि.प. निवडणुकीत विजय संपादन केल्यावर त्यांनी कापसे गटालाही कात्रजचा घाट दाखवल्याने कापसे गटातही त्यांचा रोष होताच.

निवडणुकीत काँग्रेसकडून आ. लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली होती. त्यानंतर येथील विविध विकास कामांचा शुभारंभही आ. कानडे यांच्याहस्ते नुकताच पार पडला. त्यावर कडी म्हणून माजी सभापती नानासाहेब पवार यांनी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या शुभारंभाचा नारळ वाढवून दणका उडवला.

माजीमंत्री विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर स्थानिक नेते माजी सभापती नानासाहेब पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात डेरेदाखल झाल्याने काही स्थानिक गावपुढारी त्यांच्यापासून दुरावले गेले आहेत. त्याचाच परीणाम म्हणून गेल्या निवडणुकीत पवारांशी आघाडी केलेला मुरकुटे गट दुरावला आहे. गेल्या आठवड्यातच काँग्रेस व स्थानिक मुरकुटे गटाने कार्यकर्त्यांची पेरुच्या बागेत बैठक घेऊन आगामी निवडणुकीत आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पवारांविरुध्द आ. कानडे, माजी आमदार मुरकुटे व ससाणे गटाने कंबर कसली आहे. माजी सभापती पवारही प्रमुख कार्यकर्त्यांच्या छोट्या बैठका घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तालुक्याच्या राजकारणात युती झाल्याने येथील माजी सभापती नानासाहेब पवार यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरकुटे असले तरी मुरकुटे गटाचा एकही कार्यकर्ता या कार्यक्रमास उपस्थित नसल्याने स्थानिक मुरकुटे गट आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरणार का? हे पहावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या