Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“मैने तुम्हे दिल दिया दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबाॅल समझकर”; सुषमा...

“मैने तुम्हे दिल दिया दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबाॅल समझकर”; सुषमा अंधारेंचा बच्चू कडूंना खोचक टोला

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

- Advertisement -

रवी राणा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून, शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांना खोचक टोला लगावला आहे.

“संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताटावरून उठवलं आहे, तर बच्चू कडूंचा प्रेम भंग झाला आहे. सध्याच्या सरकारमधील त्यांची अवस्था वाईट झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करते,” असं म्हणत अंधारेंनी शिंदेंवरही जोरदार टीका केली आहे.

तसेच बच्चू कडूंनी ठाकरे गटाचे सात आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं, यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, “त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत हे त्यांनाच माहित. पण त्यांचं शिंदे सरकरामध्ये असं झालंय की, मैने तुम्हे दिल दिया दिलदार समझकर, तुमने मुझे ठुकरा दिया फुटबाॅल समझकर.”

बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये ओढले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले होते. यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या