
पुणे | Pune
निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांकडून विविध भावनिक मुद्द्यांना हात घातला जातो. त्यातून पुन्हा आरोप- प्रत्यारोप, टीका- टिप्पणी सुरू होते. सध्या असाच एका वाद सोशल मिडियावर भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे रंगला आहे. राम कदम यांच्या या ट्विटवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी भाजपाचे आमदार राम कदम यांनीही एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर विनायक सावरकर, तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. राम कदम यांच्या या ट्विटची चर्चा रंगू लागली आहे.
राम कदम यांच्या या ट्विटवर ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असं म्हणत अंधभक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.