Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसंतांच्या आणि वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते - सुषमा...

संतांच्या आणि वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते – सुषमा अंधारे

पुणे | Pune

मी कुणाच्याही श्रद्धेआड आले नाही. भाजपचा एक सेल माझ्याविरोधात सक्रिय झाला आहे. मला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. या मागे भाजपचा हात आहे, असा आरोप करतानाच माझ्यामुळे जर संतांच्या आणि वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते असं शिवसेनेच्या उपनेत्या (उद्धव ठाकरे गट) सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज यांच्याबाबत हेतुपुरस्पर टीकात्मक विडंबन केले होते. इतकेच नव्हे त्यांनी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरही टिका केली होती. त्यावरून त्यांच्यावर सर्व माध्यमातून टीका केली जात आहे. त्यांच्या या टीकेवर वारकरी सांप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजात संत आणि देवतांची विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावरून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अंधारे म्हणाल्या, मी कुणाच्याही श्रद्धेआड आले नाही. पण तरीही राजकीय सूडबुद्धीतूनच मला विरोध केला जात आहे. मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत. तरीही जर माझ्यामुळे संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते.

मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केलं होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या आईने १५  एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं. पण ते विधान कापलं गेलं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यावर ईडी लावता येत नाही. म्हणून माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. मला कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं त्या म्हणाल्या.

कालपासून एक १४ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ २००९ चा आहे. ह.भ.प. गणेश शेटे यांनी कोरोना काळात मंदिरे बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. तेच या व्हिडीओवरून मला विरोध करत आहेत. हे लोक वारीत कधीच सहभागी झाले नव्हते, ते मला विरोध करत आहेत. आचार्य तुषार भोसले यांच्या कंपूतील हे लोक आहेत, असं त्यांनी सांगितलं.जे लोक वारीत कधीच पायी चालले नव्हते, त्या लोकांनी लोकांचं आरोग्य लक्षात न घेता केवळ स्टंट केला होता, अशी टीका त्यांनी केली.

भाजपने उघडलेली जी वारकरी आघाडी आहे. त्यातील हे लोक आहेत. या लोकांनी देहू आळंदीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण केलं आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही. उपमुख्यमंत्रीपद हे असंवैधानिक आहे, अशी सबब त्यावेळी या लोकांनी दिली होती. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतात ते असंवैधानिक मानायचे का? असा सवाल त्यांनी केला.

उदयनराजे नक्कीच राजीनामा देतील

उदयनराजे भोसले हे राजीनामा देतील का? असं सुषमा अंधारे यांना विचारलं असता उदयनराजे नक्कीच राजीनामा देतील असं मला वाटतंय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली. मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलू नये. सिल्व्हर ओकवर लोकांना घुसवणं योग्य आहे का? असा सवाल त्यांनी सदावर्ते यांना विचारला.

वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये

माझ्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी काल माझी अंतयात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आलेल्या असून माझी भाजपच्या वारकऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल आनंदी असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. याशिवाय वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी वारकरी आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा – वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मागणी

पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, लक्ष्मण शेरकर, सविता गवते, विठ्ठल अण्णा भापकर, आनंदराव महाराज कदम, श्यामराव महाराज गायकवाड, आदींनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची द्योतक आहे. पण सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. भागवत धर्माची उभारणी करणाऱ्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निषेधार्ह असल्याने अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या