
नवी दिल्ली | New Delhi
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Arakshan) ४० दिवसात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले होते. ते आरक्षण हे सरकार देऊ शकलेले नाही. त्यानंतर महाराष्ट्रात जी परिस्थिती ओढवली आहे त्याला ट्रिपल इंजिनचे खोके सरकार आहे. तर दुसरीकडे आरक्षण समर्थकांनी हिंसक पवित्रा घेतला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
याच हिंसक आंदोलनाचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या आहे. दुसरीकडे बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या जाळल्या आहेत तसेच ऑफिस देखील पेटवून दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, या सगळ्या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, या वेळी त्या म्हणाल्या, “मराठा आरक्षणासंदर्भात ४० दिवसांत निर्णय घेऊ असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. जी परिस्थिती आज ओढावली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. त्यांना खोके घ्यायला वेळ आहे.
पण मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यायला वेळ नाही. या सगळ्या जातसमूहांची फसवणूक करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात आज अस्थिर वातावरण आहे. लोकांना फसवायचे, सत्तेचा गैरवापर करायचा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यामाध्यमातून लोकांना छळणे, हे काम केले जात आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही.”
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युर असल्याची टीका केलीये. ‘महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण एका सिटिंग आमदाराच्या घरात जाळपोळ झाली आहे. माजलगावच्या पंचायत समितीची बिल्डिंग आहे तिथे जाळपोळ सुरू आहे.
हे पूर्णपणे इंटेलिजन्सचं अपयश आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्याचे अपयश आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.‘नुसत्या कमीट्या नेमून काय होणार आहे? तुम्ही ४० दिवस कशाला मागितले मग? ४० दिवस हे ट्रिपल इंजिन सरकार काय करत होते? ही जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक नाही झाली?’ असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते.
त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.