Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार गटाला मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले 'हे'...

शरद पवार गटाला मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ निर्देश

दिल्ली । Delhi

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह असल्याचा निकाल नुकताच निवडणूक आयोगानं दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आज नोटीस काढली. या नोटिशीत सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला जे नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं यावेळी दिले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी कोर्टाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. या मागण्या सुप्रीम कोर्टाने मान्य करत निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. तसेच अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होईल, असंही कोर्टानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आजच्या सुनावणीत युक्तिवादावेळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होतंय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकांची छपाई करावी लागणार आहे. त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्हं देण्यात येईल ते निवडणुकीपुरता कायम देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली. “अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि पक्षाचे चिन्ह पुन्हा कायम स्वरुपासाठी देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या