सुप्रिया सुळे नैराश्यात, वैफल्यग्रस्त; अजित पवार गटाची तिखट टीका

सुप्रिया सुळे नैराश्यात, वैफल्यग्रस्त; अजित पवार गटाची तिखट टीका

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी ( १८ सप्टेंबर ) केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीपीला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हणताना सिंचन आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता, असा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी चौकशीसाठी भाजपाला आव्हान दिलं. यावरून खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सुप्रिया सुळे यांना जबर धक्का बसला. त्या नैराश्यात गेल्या. त्यांचे नैराश्य अजून दूर झाल्याचे दिसत नाही. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे निर्णयही आलेत. सध्या त्या वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी विधाने करत आहेत. त्यांना हे विधान टाळता आले असते, असे तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवघा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला दिवसागणिक पाठिंबा वाढत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पंतप्रधान मोदींना उद्देशून सुप्रिया सुळेंनी म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबाबत तुम्ही कोणतीही चौकशी करा. आम्ही त्याला १०० टक्के पाठिंबा देऊ. कारण, मला आठवतंय पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक विधान केलं होतं की, एनसीपी ही ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आहे. त्यांनी दोन घोटाळ्यांचा आरोप केला होता. एक म्हणजे सिंचन आणि दुसरा बँक घोटाळा. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की, पंतप्रधान मोदींची जी इच्छा आहे, ती पूर्ण करा. तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता, कृपया त्याची चौकशी करा. हे केवळ दोनच घोटाळे नाहीत, इतरही काही घोटाळे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी नातेसंबंधाबाबत बोलत नाही. संसदेत माझे ८०० भाऊ आहेत. माझा केवळ एकच भाऊ थोडी आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत जी तळमळ आहे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात जे काही करायचं आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com