.. आम्ही रुग्णालयांना सुजय विखे यांचाच नंबर दिला असता - जयंत पाटील

.. आम्ही रुग्णालयांना सुजय विखे यांचाच नंबर दिला असता - जयंत पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

खासदार सुजय विखे यांचे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीबाबत राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे निर्माण होतील असेही ते म्हणाले.

पुण्यामध्ये पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने सुजय विखेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही रेमडेविसिरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. मात्र, अशाप्रकारे राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्व गोष्टी खऱ्या नसतात

करोनाच्या संकटकाळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे लक्ष नाही या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत बोलताना पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा, असेही पाटील यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. ते सर्व जिल्ह्यांवर नजर ठेवून आहेत. कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यात येऊन निवडणूक लढले, ते निवडूनही आले. त्यामुळे आता आपण पुण्यासाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी ते अजित पवार यांच्यावर टीका करतात, त्यांच्या बोलण्याकडे पुणेकरांनी लक्ष देऊ नये.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com