ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाविकास आघाडी सरकारमुळे ( Mahavikas Aaghadi Government ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण ( OBC Reservation ) गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत राज्य सरकारबरोबर संघर्ष चालूच ठेवावा. त्यासोबतच ओबीसी समाजाच्या शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठीही ओबीसी मोर्चाने संघर्ष करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil )यांनी शनिवारी येथे केले.

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक (Meeting of BJP OBC Morcha's state executive ) आज मुंबईत पार पडली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी वरील आवाहन केले. या बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी राजकीय आरक्षणासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले. त्याला दोन वर्षे झाली पण या सरकारने काही केले नाही. त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. न्यायालयाने सांगितलेले काम राज्य सरकारने केलेले नसल्याने आता होणाऱ्या २२ महानगरापालिका, सुमारे ३०० नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची आणि समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. यामुळे आघाडी सरकारच्या नेत्यांच्या पोटात दुखते. आघाडी सरकारचा ओबीसींच्या संरक्षकाचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा समाजासमोर उघड केला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ते पुन्हा मिळेपर्यंत भाज संघर्ष करत राहील. तथापि, त्यासोबत ओबीसी विद्यार्थ्यांना निम्मी फी मिळणे, महाज्योती महामंडळाला निधी मिळणे, ओबीसी तरूण तरुणींना रोजगारासाठी सवलतीत कर्ज मिळणे आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे उभारणे या महत्त्वाच्या विषयांवरही ओबीसी मोर्चाने संघर्ष करावा, अशी सूचना पाटील यांनी केली.

ओबीसी समाजाला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच पक्षातर्फे समाजाच्या कल्याणासाठी योजना राबवाव्यात. विशेषतः या समाजातील होतकरू तरूण तरुणींना शिक्षण - प्रशिक्षणासाठी आपण मदत करावी. पक्षाबद्दल आणि पक्ष नेतृत्वाबद्दल निर्माण केले जाणारे गैरसमज समाजातील विविध घटकांशी वैयक्तिक संपर्क करून दूर करावेत, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.