Monday, April 29, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाची हुकूमी पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती

मराठा आरक्षणाची हुकूमी पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील मराठा आरक्षणाची हुकूमी पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पाने टाकावीत, असे सांगत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी शनिवारी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना खा.संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटले पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पाने आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत म्हणाले.

खासदार संभाजी छत्रपती हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा संताप आणि भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार समजूनही घेत आहे. संभाजीराजे सर्वांना भेटले. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनाही भेटले.

मात्र, सर्वात प्रमुख भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच असायला हवी. हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिला नाही. तो केंद्राच्या कोर्टात गेला आहे, असे खा.राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या