पेढे वाटण्याची लाज वाटत नाही का?

खासदार संजय राउतांचा भाजपला सवाल
पेढे वाटण्याची लाज वाटत नाही का?

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Unification Committee) मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी सोमवारी केला....

सीमा भागातील बेळगाव (Belgaon) महापालिका निवडणुकीत (Municipal Election) महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असून भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. साहजिकच यावरून संजय राऊत यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

प्रासार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा संताप व्यक्त केला. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता, मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असे राऊत यांनी भाजपला सुनावले.

मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे.

पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर (EVM) याचं खापर फोडणार नाही. कर्नाटकाच्या (Karnataka) सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असे राऊत म्हणाले.

बेळगाव महापालिकेत प्रचारासाठी शिवसेना (Shiv Sena) नेते का गेले नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही मुद्दाम गेलो नाही प्रचाराला. कारण या निवडणुकीला वेगळे वळण लागू नये म्हणून आम्ही गेलो नाही. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही तिथे गेलो नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com