Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस काय यांच्या बापाच्या आहेत का?

पोलीस काय यांच्या बापाच्या आहेत का?

मुंबई | Mumbai

भाजपचे (BJP) विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावरील हल्ल्याच्या मुद्दावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट केला असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनास्थळाजवळ एक डंपर आणण्यात आला. पडळकर यांच्या अंगावर तो डंपर घालण्याचा प्रयत्न झाला.

या डंपरमध्ये दगड, काठ्या, सोडा बॉटल होत्या असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ही घटना पोलीस ठाण्यासमोरच झाली. या ठिकाणी साधारण २०० ते ३०० लोकं होते. पोलीस या घटनेचे चित्रीकरण करत होते, असा दावा त्यांनी केला. पडळकरांवर हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांसोबत फोटो असल्याचाही दावा फडणवीस यांनी केला.

मुंडे साहेबांवर हल्ला झाला तेव्हा त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली. भुजबळांना देखील दिली गेली. मात्र गोपीचंद पडळकर संपला पाहिजे अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर त्याकडे लक्ष घालावे, यात थेट सरकारचा संबंध आहे, पोलीस काय यांच्या बापाचे आहे का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, या राज्याला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येकाला संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो.

अजित पवारांवर जबाबदारी दिली तर चार दिवसांत राज्य विकून खाईल असे काही जण म्हणतात. ही काय पद्धत झाली. मी कुणाच्या मध्ये नसतो फक्त विकासकामांबद्दलच बोलतो. कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती कामासाठी माझ्याकडे आली तर त्यात मी मनापासून लक्ष घालतो, असे अजित पवार यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंचे उदाहरण दिले पण शरद पवारांच्या कामाची पद्धत महाराष्ट्राला माहिती आहे. मी यासंदर्भात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत बोलत होतो. काही सदस्य संरक्षण दिल्यानंतर ते नको अशी भूमिका मांडतात. पण सरकार म्हणून आम्ही त्यात लक्ष घालू. याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याची शाहनिशा करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या