विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिला 'हा' इशारा

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणातून सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिला 'हा' इशारा

नागपूर | प्रतिनिधी Nagpur

औद्योगिकदृष्ट्या अव्वल महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar )यांनी गुरुवारी शिंदे सरकारला दिला.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी. भ्रष्टाचार करणारे सत्तारुढ किंवा विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी, महिलांना संरक्षण द्यावे. राज्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करुन उद्योगांना राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा मागण्याही अजित पवार यांनीकेल्या.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Winter Sessions of State Legislatures )उद्या, शुक्रवारी सूप वाजत आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करताना पवार यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, मुख्यमंत्र्यांकडून अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर चौफेर टीका केली.

महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही पाठींबा देऊ, असा विश्वासही पवार यांनी दिला.

संपूर्ण देशात महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर राहिलेले राज्य आहे. राज्यातील औद्योगिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, धोरणातील सातत्य, कुशल मनुष्यबळ, यामुळे आपण सातत्याने पहिल्या क्रमांकावर होतो.

पण आज महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. मोठमोठे उद्योग एकामागून एक राज्याबाहेर जात असताना सत्तेवर असलेले महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.

महाराष्ट्र येत्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊ, गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही", अशी सारवासारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्यानंतर केली होती. त्याचा संदर्भ देत अहो मोठ्या भावाचा (शिवसेना) हात धरुन लहान भाऊ (भाजप) कधी "मोठा" झाला, मोठ्या भावाचे घर कसे मोडले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बहुदा, तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही करणार नाही ना? असा सवाल पवार यांनी केला

गुजरातविषयी कुणाला आकस असण्याचे कारण नाही. गुजरातला पाकिस्तान मानण्याची तर अजिबात गरज नाही आणि कोणताही पक्ष तसे मानत नाही. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आणि जनता गुजरात आणि गुजराती जनतेबद्दल प्रेम बाळगुन आहे. पण अपयश झाकण्यासाठी तुम्हाला पुन्हा "पाकिस्तान"ला मध्ये आणावे लागले. हाच तर तुमचा खेळ आहे, जो गेल्या १५ वर्षापासून भारतातील जनता पाहते आहे, असा सणसणीत टोला पवार यांनी लागवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com