शेतकर्‍यांचा माल घरात पडूनच; राज्य शासनाने धान्य खरेदी सुरू करावी

माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांची मागणी
शेतकर्‍यांचा माल घरात पडूनच; राज्य शासनाने धान्य खरेदी सुरू करावी

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

शासकीय हमी भावाने रब्बी हंगामातील ज्वारी (दादर), मका व गहूसाठी अनेक शेतकर्‍यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे.

मात्र राज्यशासनाने अद्यापही धान्य खरेदी केंद्र सुरू केली नाही. त्यामुळे पावसाळा येवूनही शेतकर्‍यांच्या घरात अजूनही धान्य पडूनच आहे. त्यामुळे लवकरात लवकर धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांनी केली आहे.

शेतकर्‍यांच्या मालाला शासकीय हमीभावाने धान्य खरेदी करण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांकडून ऑनलाईन नोंद करण्यास सांगितले होते. त्यात शिंदखेडा तालुक्याच्या खरेदी विक्री संघात दादरची नोंदणी 1530 शेतकर्‍यांनी, मकाचा नोंदणी 365 शेतकर्‍यांनी तर गहू खरेदीसाठी 6 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.

ही ऑनलाईन नोंदणी करून तीन महिन्याच्या वर कालावधी उलटूनही राज्यशासनाने अद्यापही खरेदी केंद्र सुरू केले नाही. पावसाळा लागुनही शेतकर्‍यांच्या घरात अजूनही धान पडून आहे. त्यामुळे खरीपसाठी शेतकर्‍यांना भांडवलची गरज असतांना माल घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

तसेच खाजगी व्यापारी हे धान्य कवडीमोल भावाने मागणी करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या हमीभाव योजनेचे उल्लंघन होत आहे. राज्य शासनाने आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नये, तत्काळ खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

ही संकल्पना सपशेल फेल

राज्य शासनाने विकेल ते पिकेल ही संकल्पनेतून शिंदखेडा तालुक्यात 500 एकर शेतीसाठी राज्य शासनाने फुले रेवती वाण शेतकर्‍यांना देवून आलेले उत्पादित धान्य शेतकर्‍यांकडून शासन मध्यस्थी करून फूड फ्रोसेसिंग कंपन्या खरेदी करतील, अशी योजना होती.

परंतु यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी या योजनेतंर्गत हे वाण लावून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले. परंतु तालुक्यातील मुडावद व पढावद या गावातून केवळ 100 क्विंटल खरेदी केली आहे. परंतु कमखेडा, हुंबर्डे, वारुड व पाष्टे गावातुन धान्याचा एक दाणाही खरेदी केलेला नाही. त्यामुळे ही शासनाची योजना सपशेल फेल ठरली असल्याची टीका ही आ. रावल यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com