Friday, April 26, 2024
Homeराजकीयधुळे जि.प., पं.स. पोट निवडणूक 19 जुलैला

धुळे जि.प., पं.स. पोट निवडणूक 19 जुलैला

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

न्यायालयाच्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 15 गट व पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या 30 गणांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै रोजी मतदान, तर 20 जुलै रोजी मतमोजणी होईल.

- Advertisement -

त्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या चार पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या. यातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजीच्या आदेशान्वये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असलेल्या मुद्यावर निर्णय देतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाची तरतूद अवैध न ठरवता त्यात अंशत: बदल केला होता; परंतु हा बदल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 11 मे 2010 रोजी डॉ. के. कृष्णमूर्ती विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन केल्यानंतरच लागू होईल, असे देखील स्पष्ट केले होते.

धुळे जिल्हा परिषदेतील 15 गण व पंचायत समित्यांच्या 30 निर्वाचक गणांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांसाठी झालेल्या निवडणुका तात्काळ प्रभावाने रद्दबातल ठरवून या रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त झालेल्या पदांच्या निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्याचबरोबर या पोटनिवडणुकांसाठी 27 एप्रिल 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने 22 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्य शासनाने 19 मार्च 2021 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील कोविडची परिस्थिती आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. या परिस्थितीचा विचार करता निवडणूक प्रक्रिया दोन महिन्यांसाठी स्थगित करणे आवश्यक असल्याबाबत आयोगाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कोविडच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आयोगाने समयोचित निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने त्यासंदर्भात 30 एप्रिल 2021 रोजी आदेश दिले होते.

राज्य शासनाने कोविड संदर्भात ऑक्सिजन बेडच्या रुग्णांची संख्या आणि कोरोना पॉझिटिव्हिटी दरावर आधारित धुळे जिल्ह्याचा स्तर 1 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरीता आचारसंहिता जरी संबंधित मतदार संघात लागू झालेली असली, तरी पोटनिवडणूक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तर्‍हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती,घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्री, खासदार, आमदार वा कोणत्याही पदाधिकार्‍यांना करता येणार नाही.

निवडणूकीबाबत जिल्हाधिकारी 29 जुन रोजी अधिसूचना जाहिर करतील. संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दि. 29 जून ते 5 जुलै दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरता येईल व स्वीकृत करता येईल. दि. 4 जुलै रोजी रविवार असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही.

नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. त्यानंतर लगेचच वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल.

नामनिर्देशन पत्र स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍याने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायधिशांकडे अपील 9 जुलैपर्यंत करता येईल. जिल्हा न्यायाधिशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख 12 जुलै आहे. जिल्हा न्यायाधिशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी 12 जुल रोजी प्रसिध्द केली जाईल.

उमेदवारी मागे घेण्याची (जेथे अपील नाही तेथे) 12 जुलै सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत तर जेथे अपील आहे तेथे 14 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत राहिल.

निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी व त्यांना चिन्ह वाटप (जेथे अपील नाही तेथे) 12 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर तर जेथे अपील आहे तेथे 14 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर करण्यात येईल.

मतदान 19 जुलै रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तर मतमोजणी 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 23 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येतील.

30 गणांसाठी पोट निवडणूक

शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द, विखरण बुद्रूक, तर्‍हाटी त.त., वनावल, जातोडा, शिंगावे, करवंद, अजनाळ, शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ, वर्षी, हातनूर, खर्दे बुद्रूक, मेथी, साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे, घाणेगाव, जैताणे, पिंपळनेर, चिकसे, धाडणे, कासारे, म्हसदी प्र.नेर, धुळे तालुक्यातील लामकानी, न्याहळोद, फागणे, नेर, सडगाव, बोरविहीर, मुकटी, शिरुड या 30 गणांसाठी निवडणूक होणार आहे.

15 गटांसाठी पोट निवडणूक

धुळे तालुक्यातील लामकानी, कापडणे, फागणे, नगाव बुद्रूक, कुसुंबा, नेर, बोरविहीर, मुकटी, शिरुड, रतनपुरा, बोरकुंड, शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, नरडाणा, मालपूर, खलाणे या 15 गटांसाठी पोट निवडणूक होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या