सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?

सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?

रायपूर | Raipur

छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील आपले विचार मांडले. आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सोनिया गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या, काँग्रेसची भारत जोडो यात्रा माझ्या राजकीय खेळीचा शेवटचा मुक्काम असू शकतो. 2004 आणि 2009 मध्ये आम्ही विजय मिळवला आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळं मला समाधान मिळालं. परंतु, सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी कारकिर्द भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं समाप्त होत आहे. ही यात्रा खूप यशस्वी ठरली आणि काँग्रेससाठी हा टर्निंग पॉइंट होता." दरम्यान, या घोषणेमुळं सोनिया गांधी राजकारणातून संन्यास तर घेणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. राहुल गांधींमुळं खडतर प्रवास शक्य झाला, त्यामुळं काँग्रेसचा जनतेशी असलेला संबंध जिवंत झाला आहे. काँग्रेसनं देशाला वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस देशाच्या हितासाठी लढणार आहे. तगडे कार्यकर्ते ही काँग्रेसची ताकद आहे. शिस्तीनं काम करायला हवं. आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यागाची गरज आहे, असं आवाहनही सोनियांनी केलं आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) सर्व स्वायत्त संस्थांवर कब्जा केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी नव्हे तर त्यांच्या मित्रांसाठी राज्यकारभार चालवत आहेत, असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला.

भाजपच्या राजवटीला खंबीरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याला जनसंपर्क वाढवावा लागेल, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, भाजपा विद्वेषाचे राजकारण करीत असून द्वेषाच्या आगीला हवा दिली जात आहे. अल्पसंख्य, महिला, दलित, आदिवासी यांना भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. भाजपाने प्रत्येक यंत्रणेवर कब्जा केल्याने पक्षासाठी आणि देशासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com