सरकारला बळीराजांच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही – स्नेहलता कोल्हे

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शेतकरी बांधवांच्या संवेदनांची कदर न करणार्‍या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारला बळीराजांच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजपा महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविण्याच्या महादूध एल्गार आंदोलनाची सुरूवात सौ.कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील टपाल कार्यालयात करण्यात आली. जिल्ह्यातून सुमारे 20 हजार पत्र पाठविण्यात येणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, महिला आघाडीच्या योगीता होन, शिल्पा रोहमारे, विजयराव आढाव, महावीर दगडे, दत्ता काले, दिपकराव गायकवाड, सतीश केकाण, भिमा संवत्सरकर, कोंडाजी दरगुडे, प्रभाकर शिंदे, सखाराम शिंदे, अशोक शरमाळे, अशोक पवार, कैलास सानप, शहाजादी पठाण, चंद्रभान शिंदे आदी उपस्थित होते.

सौ. कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या करोना परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. कांद्याचे भाव कोसळल्यामुळेही शेतकरी अडचणीत आहे. अशा विविध संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर दुःखाचे सावट आहे. परंतु राज्यातील निष्क्रीय सरकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

दुधाचे दर एवढे कमी नसतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दूधाला 5 रुपये प्रतिलिटर अनुदान खात्यावर जमा केले होते. दुधाला 30 रुपये प्रतिलिटर भाव द्यावा. प्रतिलिटर 10 रुपयाचे अनुदान आणि भुकटीला 50 रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे या मागणीसाठी एक महिन्यापूर्वी शेतकरी बांधव रस्त्यावर उतरला, तरीही या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. ही दुर्दैवाची बाब असून या शेतकर्‍यांच्या संवेदनाची कदर न करणार्‍या सरकारला जाग आणण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे सौ.कोल्हे म्हणाल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *