श्रीरामपुरच्या गणेश विसर्जनावरुन आरोप - प्रत्यारोप

श्रीरामपुरच्या गणेश विसर्जनावरुन आरोप - प्रत्यारोप

गणेश विसर्जनाचे अपवित्र कार्य करणार्‍या पालिका सत्ताधार्‍यांचा निषेध - चित्ते

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कचरा गोळा करणारी ट्रॅक्टर गणेशाच्या मूर्ती गोळा करण्यासाठी भागात पाठवले.

श्रीगणेशाचे विसर्जनचे अपवित्र करणारी व्यवस्था पालिकेने केली होती. गणेशाच्या पावित्र्याची आणि हिंदूच्या भावनाची हेटाळणी करणार्‍या नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांचा मी तीव्र निषेध करतो. याचे परिणाम नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांना भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला.

कोव्हिडच्या या पार्श्वभूमीवर भागा भागात नगरपालिकेन एक दिवसाकरता बाजारातील छोटी मालवाहू वाहने भाड्याने घेऊन गणेशाच्या मूर्ती गोळा करण्यासाठी पाठविणे गरजेचे होते. मात्र कुठलीही स्वच्छता न करता कचरा गोळा करणारे ट्रॅक्टर पालिकेने श्री गणेशाच्या मूर्ती गोळा करण्याकरिता पाठविले या ट्रॅक्टर ट्रॉली यांची अवस्था अत्यंत गचाळ आणि घाणेरडी होती.

ट्रॉलीच्या तळाला भोके पडून ट्रॉलीची चाळणी झालेली होती, त्यावर कुठलीही कापड टाकलेले नव्हते, अशा पद्धतीने श्रीगणेशाचे विसर्जनाचे अपवित्र करणारी व्यवस्था पालिकेने केली होती.

यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचे काम पालिकेकडून करण्यात आले आहे. यापुढील काळात नगरपालिकेच्या या भूमिकांच्या विरोधात आम्ही मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा या पत्रकात श्री. चित्ते यांनी दिला आहे

अशा प्रकारचे कार्य करणार्‍यांना श्रीगणेश कधीच माफ करणार नाही - ससाणे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीगणेश विर्सजनाच्या दिवशी पालिका प्रशासनाने श्रीगणेश मूर्ती नेण्यासाठी जी घाणेरडी कचरा वाहून नेणारी वाहने ठेवली होती. अशा वाहनातून श्रीगणेश मूर्ती नेवून विसर्जित करण्याचा प्रकार घाणेरडा आहे. अशा प्रकारचे कार्य करणार्‍यांना श्रीगणेश कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्य्त करून निषेध केला.

करोना संसर्ग वाढू नये म्हणून यावर्षीचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने गर्दी न करता उत्सव साजरा करण्यावर भर दिला होता. श्रीरामपूर काँग्रेसच्यावतीने भागाभागात चांगल्या स्वच्छ मालवाहू टेम्पो ठेवण्यात आल्या होत्या.

घराघरात जावून त्यांनी श्रध्दापूर्वक गणेश मूर्ती घेवून ती विसर्जित करण्याचे काम काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले, परंतु पालिकेने कचरा उचलणारी ट्रॅक्टर घाणेरडे कोणतेही अच्छादन नसलेल्या ठिकाणी श्रीगणेशाचे मूर्ती घेवून त्या घाणेरड्या पाण्यात विसर्जित केल्या. अशा प्रकारचे कार्य करणार्‍यांचा निषेध करत असल्याचे श्री. ससाणे यांनी सांगितले.

नागरिकांच्या भावना दुखविणार्‍या पालिका प्रशासनाचा निषेध - खोरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाने जागोजागी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी कचरा संकलन करणारी वाहने वापरल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. नगरपालिका प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली आहे.

विविध भागाभागातून गणेश मूर्ती संकलीत करण्यासाठी पालिकेने पर्यायी चांगल्या वाहनांची व्यवस्था करणे गरजेचे होते. याबाबत नगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी ट्रॅक्टर धुवून घेतल्याचे सांगितले.

यापूर्वी अनेकदा नगरपालिका प्रशासनाने सर्वधर्मीय नागरिकांच्या भावना कोणत्या ना कोणत्या कारणांनी दुखावल्या आहेत. कचरा संकलन करणार्‍या ट्रॅक्टरमध्ये मृत जनावरे, शहरातील सर्व प्रकारच्या कचर्‍याची वाहतूक वर्षभर केली जाते.

इतकी मोठी चूक करूनही श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर वापरण्याचे समर्थन करणार्‍या राज्यकर्त्यांनी गणपती विसर्जन बिसलरीच्या पाण्यात करतो का? असा प्रश्न विचारून श्रीरामपुरकरांच्या धार्मिक भावना आणखी दुखविल्या आहेत.

गणपती विसर्जनासाठी कचरा संकलन ट्रॅक्टर वापरणार्‍या व त्यांचे समर्थन करणार्‍या नगरपालिका प्रशासनाचा केतन खोरे यांनी निषेध केला आहे.

देवा धर्माच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करण्याचा प्रकार - नगराध्यक्षा आदिक

श्रीगणेश विसर्जनाच्या नावाखाली देवा-धर्माच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करण्याचा प्रकार हा निंदनीय असा आहे. नगर पालिकेने गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती संकलित करतांना कोणत्याही प्रकारची मूर्ती विटंबना होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. सर्व ट्रॅक्टर हे स्वच्छ पाण्याने धुवून त्याला सॅनिटायझर करण्यात आले होते. चांगल्या प्रकारचे अच्छादन आंथरुन गणेश मूर्ती संकलीत करण्यात आल्या होत्या. कोणतेही ट्रॅक्टर हे घाणेरडे नव्हते. आता पालिकेच्या विरेाधात कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नसल्यामुळे देवा-धर्माच्या नावाखाली श्रीगणेशाच्या नावाने घाणेरडे राजकारण केले जात नाही हे निंदनीय असे असल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले. हिंदू धर्माच्या भावना आम्हालाही माहिती आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे गणेशाची मूर्ती भंगणार नाही, याची काळजी घेतली. घाणेरड्या पाण्यात मूर्ती विसर्जित केल्या जावू नये म्हणून आम्ही विरोध केला त्यावरुन श्रीरामपुरात आमच्याविरोधात अशाप्रकारे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com