श्रीगोंदा : ‘अविश्वास’ संमत होण्यापूर्वीच उपसभापतींचा राजीनामा
राजकीय

श्रीगोंदा : ‘अविश्वास’ संमत होण्यापूर्वीच उपसभापतींचा राजीनामा

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात 12 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यासंदर्भात 29 जुलै रोजी श्रीगोंदा, पारनेरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. 18 पैकी 12 संचालक अविश्वास ठराव बाजूने असल्याने त्यापूर्वीच बाजार समितीचे उपसभापतींनी आपला राजीनामा उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहिर यांच्याकडे सुपूर्त केला आणि त्यांनी तो मंजूर केला आहे.

श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोइटे यांनी राजीनामा दिल्यानंतर काही काळातच त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. तीन वर्षेे नामधारी म्हणून काम केलेले भोइटे यांचे सह्यांचे अधिकार उपसभापती यांच्याकडे होते. या राजीनाम्यानंतर संचालक उमेश पोटे यांच्या तक्रार अर्जावर जिल्हा निबंधकांच्या आदेशाने बाजार समितीचे सचिव दिलीप डेंबरे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याच वेळी 12 संचालकांनी उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठरावाबाबत 29 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे बैठक होणार होती. त्यापूर्वीच उपसभापती वैभव पाचपुते यांनी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांच्याकडे अचानकपणे राजीनामा दिला.

आता बाजार समितीच्या सभापतींनी राजीनामा दिला आहे. उपसभापतींनी देखील अविश्वास ठराव मंजूर होण्याच्या अगोदर राजीनामा दिला असल्याने पुढील सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीचा कार्यक्रम 10 ऑगस्टच्या आसपास होण्याची शक्यता आहे.

सभापती आणि उपसभापती यांचे राजीनामे मंजूर झाले असल्याने नवीन सभापती पदासाठी विखे समर्थक असलेले संजयराव जामदार यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात असले तरी उपसभापतिपद कुणाच्या पदरात पडते याबाबत अजून सस्पेन्स आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com