
मुंबई | Mumbai
राज्यातील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असलेला संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत असून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे.
उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.
दरम्यान नवं चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसैनिक मातोश्रीवर मशाल घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना संबोधून बोलताना उद्धव ठाकरेंनी गद्दारीला जाळण्याचे आदेश शिवसैनिकांना (Shivsainik) दिले.
उद्धव ठाकरेंनीही मशाल हाती घेत विजयी भावमुद्रेने स्मितहास्य केलं. अन्याय जाळणारी मशाल आता आपल्याला मिळाली आहे, असं सांगत अंधेरी पोटनिवडणुकीचं रणशिंगच त्यांनी फुंकलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत तथा शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.