
मुंबई | Mumbai
ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहित (आयपीसी, १८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी,१८९८) आणि भारतीय पुरावा कायद्यांना (एव्हिडेन्स अॅक्ट, १८७२) तिलांजली देत त्याऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ हे ३ नवीन कायदे लागू करणारे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेच्या पटलावर ठेवले. मात्र हे कायदे रद्द करण्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी ब्रिटिश कालीन कायदा रद्द केलायं पण, त्या कायद्यालाही मागे टाकणारे कायदे वापरून राजकीय विरोधकांना अडकवलं जात आहे.राजकीय दृष्ट्या भविष्यात त्यांना त्रास होईल, अशा लोकांना तुम्ही तुरुंगात टाकत आहात, त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याचं फारसं कौतुक सांगू नका. तसेच, केंद्र सरकारकडून ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायदे निर्माण केले जात आहेत. या कायद्यांचा वापर करुन राजकीय विरोधकांना जेरीस आणलं जात आहेत. जे तुमच्या पक्षात ते निर्मला वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच अजित पवार गटातील नेत्यांवरही राऊतांनी जहरी टीका केली असून ते म्हणाले, जे नेते तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांनाच सत्ताधाऱ्यांनी मंत्री केलं आहे. असं राऊत म्हणाले आहेत.
तसेचराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या सुटकेवरून संजय राऊत यांनी वेगळाच दावा केला आहे. नवाब मलिक कसे सुटले हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली. नवाब मलिक सुटले याचा आनंद आहे. मलिक यांना मोकळा श्वास घेता येईल याचा आनंद व्यक्त करतो. एका मंत्र्याला १६ महिने तुरुंगात ठेवले जाते. त्याची ट्रायल सुरू नाही. हा कोणता कायदा आहे? आपल्या राजकीय विरोधकांचा असा छळ ज्या कायद्याने केला जात आहे, तो देशद्रोहापेक्षा डेंजर आहे, असं सांगतानाच नवीन इंजेक्शन घेतल्यामुळेच नवाब मलिक सुटले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मलिक १६ महिन्यानंतर सुटले. पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांना अशाच प्रकारच्या कायद्याने सोडलं आहे. जे चाललं आहे ते देश हुकूमशाहीकडे चालल्याचं लक्षण आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याची टिमकी वाजवू नका. ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायद्याचा वापर तुम्ही राजकीय विरोधकांच्यासाठी करत आहात. तो देशद्रोहाच्यावर आहे, असा हल्लाही राऊत यांनी चढवला.