मोदी भाबडे, निरागस अन् निष्पाप; शिवसेनेचा टोला

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोदी भाबडे, निरागस अन् निष्पाप आहेत असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.

‘नितीश कुमारांचे नेतृत्व उत्तरेत वरचढ ठरू शकेल व त्याचा फटका भाजपला बसेल असा लोकांचा अंदाज आहे. मोदी यांनी एऐक वार केला की नितीश लगेच पलटवार करून उत्तर देतात. त्यावरप भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे टुमणे सुरू केले पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्राष्टाचाऱ्यांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला शिंदे गट हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणीतरी सत्य माहिती द्यायला हवी,’ अशी खरपूस टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.

‘भाजपने महाराष्ट्रात भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन एक गट केला. त्याला आता शिंदे गट म्हणून ओळखले जाते. स्वतः शिंदे व त्यांच्या लोकांवर ईडी चौकशीचे जोखड होते. त्यांच्या बरोबरच्या किमान १० आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळ्यांचा एक राजकीय गट स्थापन करून भाजपने त्यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पुन्हा आश्चर्य असे की, या गटाचे आमदार सांगतात, आम्ही भ्रष्ट असलो तरी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. निरागस मोदींनी या सर्व प्रकरणाचा नीट अभ्यास करावा. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी गटास शिवसेना असे वारंवार संबोधणे हा सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.

तसेच ‘भाजपचे काही लोक खा. भावना गवळींना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते. पण मोदींनी भावनाताईंकडून प्रेमाणे राखी बांधून घेतली आणि ताईंवरचे सर्व आरोप स्वच्छ झाले. संजय राठोड या मंत्र्याची एक क्लिप आजही पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. भाजपच्या रणवाघिणीने ती क्लिप दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना दाखवायला हवी. म्हणजे आपण किती अंधारात आहोत व आसपासचे सत्य आपल्यापर्यंत कसे पोहोचू दिले जात नाही हे त्यांना समजेल. महाराष्ट्र सरकार बेकायदा व भ्रष्ट आहे. पण मोदी विरोधकांवर बाण सोडत आहेत. ईडी व सीबीआयचा वापर विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी केला जात आहे,’ असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *