
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात सध्या भोंग्यांच्या प्रकरणावरून (Loudspeaker row) राजकारण पेटलं असून राज्यभर तणाव निर्माण झाला आहे. त्यातच राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा अट्टाहास केल्याने राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जातीये. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केलीय आहे.
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांचे मन अशांत झाले आहे. अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. जेणेकरून फडणवीसांचं मन शांत होईल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच, महाराष्ट्र भाजपचे नेते लोकशाहीवर प्रवचन झोडतायत, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही लोकशाहीवादी आहे. मोदींकडून भाजपच्या नेत्यांचे नेतृत्व होत असून, सत्तेत न आल्यामुळे विरोधकांच्या स्पीकरमधून अशी व्यक्तव्य करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, कोणी एखादा माथेफिरू वेडा स्वतःवरती हल्ला झाला, हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि तो टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल. तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र डागलं.