खोके मिळाले म्हणून की माझ्यामुळे गेला?; संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

खोके मिळाले म्हणून की माझ्यामुळे गेला?; संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सोमवारी निवडणूक आयोगासमोर (Election Commmission) लेखी निवदेन सादर केलं. शिवसेना (Shivsena) पक्षनाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह (Election Symbol) या वादावर लेखी निवेदन सादर करण्यास आयोगाने सांगितलं होतं. ठाकरे गटाने (Thackery Faction) ई-मेलद्वारे तर शिंदे गटाच्या वकिलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन लेखी प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) राऊतांमुळे आपण परराज्यात गेलो होतो असा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर संजय राऊतांनीही प्रतिउत्तर दिल आहे. 'त्यांनी आधी ठरवून घ्यावं, माझ्यामुळे सोडून गेले, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे गेले किंवा हिंदुत्वाची भूमिका वेगळी होती, त्यामुळे गेले. का खोके मिळाले म्हणून गेले का? याबद्दल त्यांनी खुलासा केला पाहिजे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

'लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असे शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) म्हणाल्या होत्या. त्यांनी एकदा स्पष्ट करावं की ते नेमकं का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून सोडून गेले की खोके मिळाले म्हणून सोडून गेले', असं संजय राऊतम्हणाले आहेत.

'ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतात, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेलं आहे. ते भाषण काळजीपूर्वक पाहा तुम्ही. म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललोय ते. यांना आल्यावर दंडुक्यांनी बडवा, यांचा पार्श्वभाग सुजवा आल्यावर असं त्यांच्या प्रवक्या शीतल म्हात्रे यांनीच शिवसेनेत असताना केलेलं भाष्य आहे. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाल्या', असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी अर्थसंकल्पावरूनही मोदी सरकारवर देखील जोरदार हल्लबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, 'काही वर्षांपासून देशाची स्थिती म्हणजे दोघेच खरेदी करतात आणि दोघेच विकतात, अशी झाली आहे. त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात गेला आहे, तो आणखी खड्ड्यात जात आहे.'

तसेच, 'आम्ही अर्थसंकल्पाकडे सामान्यांच्या दृष्टीकोनातूनच पाहणार आहोत. अदानी, अंबानींच्या विचारांनी अर्थसंकल्पाकडे आम्ही पाहणार नाही. केंद्र सरकारनेही केवळ एक, दोन उद्योगपतींचे हित न बघता सर्वसामान्यांचा प्रामुख्याने विचार करुन त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प सादर करावा. अन्यथा हिंडनबर्गसारख्या एखाद्या संस्थेच्या अहवालानेही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते.' असही संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाचा दावा काय?

संजय राऊतांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या उत्तरात केला आहे. आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणं कठीण होईल या राऊतांच्या विधानाचा दाखला शिंदे गटाने दिला आहे. तसंच सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवरही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता हे शिंदे गटाने नमूद केलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com