'एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात'

भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या विधानावरून शिवसेनेचे कंगनावर टीकेचे बाण
'एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात'

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सर्वच स्तरातून आता तिच्यावर टीका सुरु आहे. तसेच राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवरून कंगना रनौतला पाठिंबा देणाऱ्या भाजपावर (BJP) आता शिवसेनेनं (Shivsena) आगपाखड सुरू केली आहे. शिवसेनेने मुखपत्रातून कंगना रनौतच्या या विधानाचा समाचार घेत भाजपावर देखील निशाणा साधला आहे. (Kangana Ranaut controversial statement about Indian Independence)

शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटलं आहे की, 'कंगनाबेन यांना नुकतेच पद्मश्री (Padma Shri) या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव आहे. कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला आहे. तिचं नथुरामप्रेमही उफाळून येत असतं. तिच्या बरळण्याकडे एरवी कुणी फारसं लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात, असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं ठरतं', अशा शब्दांत शिवसेनेने कंगनावर टीकेचे बाण सोडले आहे.

तसेच 'कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी (Varun Gandhi) म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही. शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ.' असा टोला देखील भाजपाला लगावला आहे.

कंगनाने काय केलं होतं वादग्रस्त वक्तव्य?

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं आहे.'
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com