मुंबई | Mumbai

बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, "धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्वही आहेत. सुजाण, प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावेत? काय नाही, याचा अनुभव सर्वाधिक कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. याप्रकरणामुळे महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल, तर तो भ्रम आहे." तसेच "धनंजय मुंडे यांचा विषय हा पूर्णपणे कौटुंबिक आहे. राजकीय विषयामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही, पण कौटुंबिक विषयांमध्ये कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. जसं काल जयंत पाटलांनी सांगितलं की, राजकारणात शिखरावर जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एका क्षणात त्यावर चिखलफेक करुन आपण त्या संपूर्ण कुटुंबाच जीवन उद्धवस्थ करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसांत करु नये, हे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत. हे शरद पवार यांनीही आम्हाला सांगितलं आहे." असे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

केंद्राला शेतकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार आडमुठी वाटत आहे

“केंद्राला शेतकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार आडमुठी वाटत आहे. त्यातून प्रश्न कसा सुटणार? शेतकऱ्याने सुप्रीम कोर्टात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही. कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जी समिती स्थापन झाली आहे त्यातील चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एक पाऊल पुढे टाकलं तर आकाश कोसळणार नाही. केंद्र सरकार मजबूत आहे…त्यामुळे ते कोसळेल किंवा प्रतिमा मलीन होईल असं होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “केंद्र सरकारने माघार घेऊ नये पण समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे.,” असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते. तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.