सरनाईकांच्या 'त्या' आरोपाला मुश्रीफांनी दिलं उत्तर, म्हणाले...

प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मांडली भूमिका
सरनाईकांच्या 'त्या' आरोपाला मुश्रीफांनी दिलं उत्तर, म्हणाले...

कोल्हापूर | Kolhapur

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. या पत्रावरून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. सर्वच पक्षांतून यावर प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे भाजपची महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी असावी,' अशी शंका मुश्रीफ यांनी उपस्थित केली आहे. तसेच 'राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. मात्र या आरोपाचे खंडन करत तिन्ही पक्ष एकत्रितरित्या काम करत असून राज्यात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे' मुश्रीफ म्हणाले.

'राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूधसंघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले असल्याचा दाखला मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे उलट महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी जोमाने काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत असल्याचे' मुश्रीफ यांनी सांगितले.

'प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात कंगना रानौत व अर्णब गोस्वामी यांच्यावर आणलेल्या हक्कभंगानंतर भाजपने सरनाईक यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून परिवहन मंत्री अनिल परब, आ. रवींद्र वायकर यांनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचे काम झाले. हा केवळ राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तो कधीही यशस्वी होणार नाही,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'सरनाईक यांच्या लेटरबॉम्बआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही एक लेटरबॉम्ब टाकला होता. मात्र अशा कोणत्याही लेटरबॉम्बद्वारे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोपर्यंत हे सरकार पाच वर्षेच काय तर पंचवीस वर्षे टिकेल,' असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com