Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'कोणाच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरणार नाही'

‘कोणाच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरणार नाही’

मुंबई | Mumbai

‘कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हात जळून खाक होतील’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रतीउत्तर दिले आहे. संजय राऊत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

- Advertisement -

संजय राऊत बोलतांना म्हणाले, “फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनी असं बोलणं हे त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं आहे. राजकारणात कोणी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांच्या अंगावर जाण्याची आमची परंपरा नाही. एका मर्यादेत कोणीही आपली भूमिका मांडू शकतो. मात्र, आमच्यासाठी शिवरायांचा भगवा हा एकच भगवा आहे. त्यामुळं मुंबईवर आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकतोय तो शुद्ध आहे की फडणवीसांचा भगवा शुद्ध आहे याचा निर्णय मुंबईकर घेतील.”

तसेच, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मिळवण्यासाठी १०६ हुतात्मे झाले आहेत. दिल्लीतून किंवा केंद्र सरकारकडून जेव्हा केव्हा मुंबईवर संकट आलंय, तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. त्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत. शुद्ध भगवा फडकवण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हा इतिहास चाळावा, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी नाव न घेता अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणाले की, “बीएमसीने ज्या नटीचं कार्यालय तोडलं ती भाजपची कार्यकर्तीच आहे. ती मुंबई पोलिसांना माफिया म्हणते. मुंबईला पाकिस्तान बोलते. मुंबईकर तिच्याविरोधात उसळून उठले, पण तिच्या समर्थनार्थ कोण आले तर ज्यांच्याकडे शुद्ध भगवा आहे.” तर अर्णब गोस्वामी यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. “अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अँकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभे आहोत. पण हे लोक त्या अमराठी अँकरच्या पाठिशी उभे राहून रस्त्यावर येत आहेत. हे तुमचं मराठीपण, हा भगवा?” असं संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?

मुंबईत बुधवारी पार पडलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असते आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आता आली आहे,’ असं ते म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या