...तर आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू; संजय राऊतांचा टोला

...तर आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू; संजय राऊतांचा टोला

मुंबई | Mumbai

राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नावांची यादी राजभवनातून हरवली असल्याची माहिती मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या माहितीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. परंतु राजभवनातून गायब झालेली यादी सुरक्षित असल्याचे राजभवनातून कळते आहे. यादी गायब झाली नसून राजभवनातच आहे परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या यादीवर कधी निर्णय घेणार याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. या गोंधळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राजभवनातू फाईल मिळाल्याच्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, 'फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्या फाईलवर जेव्हा राज्यपाल सही करतील तेव्हा संपुर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे भूतानी पळवली नाही. पण भुतं त्यांच्या आसपास आहेत असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.

तसेच, 'परंतु प्रश्न एवढाच आहे जो हायकोर्टाने विचारला आहे की, फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही. ती बोफोर्सची यादी आहे का? ती यादी राफेलची आहे का? ती फाईल भ्रष्टाचाराची आहे का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

'राज्यपालांना देण्यात आलेली ती फाईल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकमताने मंजूर करुन १२ नामनियुक्त सदस्यांची फाईल आहे. त्या फाईलवर ६ ते ८ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसे नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. राज्यपालांनी गतीमानता राज्याच्या कामात दाखवली तर नक्कीच महाराष्ट्राची परंपरा जी आहे ती गतीमान राहील', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच, 'उत्तर प्रदेशातील घटनांवरून भाजप-संघ बैठक झाली. सरसंघचालक मोहनराव भागवत आदरणीय आहेत. परखडपणे त्यांनी काही गोष्टींवर मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला आणि मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहून आली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वचा होता आणि राममंदिराइतकाच महत्वाचा होता . त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जनतेला अपेक्षा आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं याबद्दलचं मत व्यक्त केलं पाहिजे', असे राऊत म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com