अखेर अर्जुन खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर

अखेर अर्जुन खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर

जालना | Jalana

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घोषित केला.

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंशी बोलून एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. जालना येथे पत्रकारपरिषदेत त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली.

पत्रकार परिषदेत खोतकर म्हणाले, मी जालन्यात माझी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करेन, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत आहे. मी १९९० मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो.'

तसेच, 'सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.' असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'आज सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझं सविस्तर बोलणं झालं. माझ्यावर ओढवेलली माहिती मी पक्षप्रमुखांना सांगितली. त्यानंतर मी संजय राऊतांशी बोललो. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. मी ४० वर्षांचा सच्चा शिवसैनिक आहे. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगताना मी उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली. त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com