
मुंबई | Mumbai
आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर आजची प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आले. ३४ वेगवेगळ्या याचिका आता यापुढे ६ याचिकेत मांडल्या जातील.
यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रं ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी केली, ती मागणी अध्यक्षांनी मान्य केली. यावेळी दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली ती माझ्यासमोर सादर करा असे निर्देशही दिले. ठाकरेंच्या वकिलांनी आज पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. २५ ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे २६ ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल.
विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतल्यानंतर प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचे वकील प्रविण टेंबेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “पुरावे देण्यासाठी आम्हाला अध्यक्षांनी वेळ वाढवून दिला आहे. १ ते १६ ची १ याचिका, १७ ची वेगळी २ याचिका केली आहे. अशा ६ याचिका करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया लवकर व्हायची असेल तर उद्धव ठाकरे गटाने वारंवार अर्ज करु नये ,असे अध्यक्षांचे म्हणणे आहे. २६ ऑक्टोबर नंतर इशू फ्रेम होतील आणि सुनावलीला सुरुवात होणार”, अशी प्रतिक्रिया वकील प्रविण टेंबेकर यांनी दिली.
आजच्या सुनावणीत काय झाले
विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान एकूण ३४ याचिका एकत्र करण्यात आल्या आहेत. याच ३४ याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये १ ते १६ ठाकरे गटाच्या याचिका असतील. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली असल्याची माहिती वकिलांनी दिली.
राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी वक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला.