मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना नेत्यांना बजावण्यात येत असलेल्या सततच्या नोटिसांमुळे शिवसैनिकांनी ईडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून ५ जानेवारीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस पाठवली आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत यांनी ईडी आणि त्यानिमित्ताने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेने ईडीच्याविरोधात आक्रमक भूमिका घ्यायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे कळते. येत्या ५ जानेवारीला राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. येत्या ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असून त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर राहणार असल्याचे समजते.

शिवसेनेकडून एकप्रकारचे शक्तीप्रदर्शनच केले जाणार असल्याचे समजते. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करीत आहे हेच यातून शिवसेनेला दाखवायचे असल्याचे सांगण्यात येते.