Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेने आत्मचिंतन करावं'

‘एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेने आत्मचिंतन करावं’

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे की, “ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक ठिकाणी नोंदणी राहिली. आम्ही मतदारांची नोंदणी करण्यात कमी पडलो. माझ्या घरची, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरची चार नावं नाहीत. तरीदेखील जे निवडणूक जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं” असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

तसेच, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू.” असंही त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, नागपूर हा देखील भाजपाचा गड मानला जातो. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचा या भागामध्ये असलेला आपला करिष्मा निवडणूकीमध्ये यश मिळवण्यात कामी आलेला नाही. पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संदीप जोशी पिछाडीवर आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६० हजार ७४७ चा कोटा पूर्ण करण्यासाठी अभिजित वंजारी यांना ४ हजार मतांची गरज आहे. मतमोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मागील ५ दशकामध्ये पहिल्यांदाच भाजपा पराभवाच्या छायेत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पिछाडीवर आहेत.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण ७८ सदस्य आहेत. यामध्ये ३१ सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर १२ जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित ७ उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर ७ पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या