Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

मुंबई / प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहील, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी दिले. राज्यातील आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेलच पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उठलेल्या राजकीय वावड्या निराधार ठरवत पवार यांनी शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना दिलेल्या शब्दाची आठवण आपल्या पदाधिकाऱ्यांना करून दिली.

- Advertisement -

“हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पवार यांनी आघाडीचे सरकार राजकीय संकटात असल्याची किंवा राज्यात सत्तांतर होण्याची चर्चा निराधार ठरवली. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही, असे पवार म्हणाले.

आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणला पटले नसते. पण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली आणि लगेच वेगवेगळ्या वावड्या उठवण्यात आल्या. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही, पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहतो आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणारा आहे, असे पवार म्हणाले.

जनता पक्षाचे राज्य आले त्यानंतरच्या कालखंडात काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाच पुढे आली. शिवसेना नुसती पुढे आली नाही तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवारउभा केला नाही, याची आठवण पवार यांनी करून दिली. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. शिवेसनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला.पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले, पण राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केली. जनतेच्या बांधिलकीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, या शब्दात त्यांनी पक्षाच्या वाटचालीचे श्रेय जनतेला दिले. काही लोक पक्ष सोडून गेले पण त्यामुळे नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत, असे सांगत पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे कौतुक केले.

लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याचे १०० टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचे असून त्यांची बांधीलकी कायम ठेवली पाहिजे, असा सल्ला पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिला.मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिकांच्या हाती गेली पाहिजे. समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या