वायकरांच्या नियुक्तीनंतरही शिवसेना आमदारांची नाराजी कायम ?

राष्ट्रवादीकडून निधीत अन्यायाची भावना!?
रवींद्र वायकर
रवींद्र वायकरराजकीय

मुंबई । (किशोर आपटे)

माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र वायकर यांची पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. कामे होत नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार असल्याने वायकर यांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. मात्र तरीही शिवसेना आमदारांची नाराजी कायमच असल्याचे सांगण्यात येत आहे. समन्वयक नेमल्याने यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून कामे करता येणार नसल्याची खंत काही आमदार व्यक्त करत असून या नियुक्तीमुळे आपले महत्व कमी होईल म्हणून ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील प्रतोद नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वायकर यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या आमदारांचा ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क कमी होईल त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

रवींद्र वायकर मातोश्रीच्या अगदी जवळचे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे. यापूर्वी फेब्रुवारी२०२० मध्ये रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसे आदेशही जारी झाले होते. मात्र लाभाचे पद असल्याचा आरोप झाल्याने वायकर यांनी हे पद स्वीकारले नाही. मात्र आता पुन्हा एकदा त्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्यातून राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लवकर होतात.

महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ आपल्या आमदारांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात आहे. तसेच अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे. या सगळ्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. भविष्यात शिवसेनेच्या आमदारांकडून कामे झाली नाहीत तर जनतेचा रोष वाढेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही आपल्याला निधी मिळत नाही, याची खंत शिवसेनेच्या आमदारांना वाटते. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशीच नाराजी होती. आता निधी वाटपावरून शिवसेनेतील अनेक आमदार नाराज आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com