अहंकाराने देश चालत नाही; शेतकरी आंदोलकांशी चर्चेनंतर राऊतांची केंद्र सरकारवर टीका

अहंकाराने देश चालत नाही; शेतकरी आंदोलकांशी चर्चेनंतर राऊतांची केंद्र सरकारवर टीका

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे.

दिल्ली | Delhi

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश गाझीपूर बॉर्डर वर आंदोलन करत असलेल्यांना शेतकर्‍यांच्या भेटीला आज (2 फेब्रुवारी) संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं एक शिष्टमंडळ पोहचलं होतं. या भेटीमध्ये राकेश टिकैत यांची भेट घेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही आज राकेश टिकैत यांना भेटून आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो आहोत असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संसदेमधील लढाई तेथे पण आज आम्ही थेट युद्ध भूमीत येऊन आमचा पाठिंबा शेतकर्‍यांना दर्शवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'

तसेच, राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही. राजकारणही चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सची भिंतच उभारली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, 'एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसलं नसतं'. असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकारने हे नवीन कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत 11 बैठकी झाल्या असून, त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार नव्या कृषी कायद्यांना दिड वर्षासाठी स्थगित करण्यास तयार आहे. मात्र शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, त्यांनी जोपर्यंत सरकार हे कायदे रद्द करीत नाही. तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचं सांगितले आहे. दरम्यान, येत्या 6 फेब्रुवारी शेतकरी देशातील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणार आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 03 दरम्यान हा चक्काजाम करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com