Monday, April 29, 2024
Homeराजकीयसरकार पाच वर्ष टिकेल,पण पक्ष बांधणीही महत्वाची !

सरकार पाच वर्ष टिकेल,पण पक्ष बांधणीही महत्वाची !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल तिळमात्र शंका नाही, असा विश्वास देत राजकारण आणि मैत्री या स्वतंत्र बाबी आहेत.

- Advertisement -

सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेच पाहिजे असे सांगत खा.संजय राऊत यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री भेटीचा निर्वाळा केला. मात्र सरकार आणि पक्षबांधणी या स्वतंत्र बाबी असून आपण पक्ष संघटनासाठी दौरा करीत असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना नेते खा.संजय राऊत हे आज धुळे दौर्‍यावर होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यासोबतच दुपारी हॉटेल चंद्रदीपमध्ये शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर खा.राऊत बैठकीला संबोधित करतांना म्हणाले, पक्ष संघटनेची बांधणी मजबूत असली पाहजे.

कार्यकर्ते हाच संघटनेचा आत्मा असतो. शिवसेना प्रमुखांनी याच मावळ्यांच्या जोरावर राज्यात पक्षाला सत्तेपर्यंत नेले. आजही पक्ष सत्ता सांभाळत असून राज्याचे नेतृत्व करतांना शिवसैनिक अनेक महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे नेतृत्व करावे लागत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचा व्याप पाहता आपण राज्यात दौर्‍यासाठी बाहेर पडलो आहोत. याची सुरुवात उत्तर महाराष्ट आणि धुळ्यापासून केली. आता नंदुरबार, जळगाव पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही जाणार असल्याचे ते म्हणाले.

प्रश्न आणा, आपण सोडवू

या परिसरातील नागरी समस्या, जनमानसांशी निगडीत प्रश्न, विकासाचे प्रश्न घेवून या. मुंबईत आपण मुख्यमंत्री आणि हव्या त्या मंत्र्यांची वेळ घेवून स्वतः हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही देखील खा.राऊत यांनी लोकप्रतिनिधींना दिली. शिवसैनिकांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाताळावेत, गरज पडेल तिथे मदतीला धावून जावे हिच आपल्याला शिवसेना प्रमुखांची आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिकवण आहे.

जनतेला कोरोना काळात दिलासा द्यावा. जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्यानुसारच शिवसैनिकांनी काम केले पाहिजे. शेतकर्‍यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, महानगर पालिकेतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. हे करतांना आजी-माजी पदाधिकार्‍यांनी हातात हात घालून संघटनेच्या कार्यात वाहून घ्यावे.

आपण शिवसेनेला काय देऊ शकतो, हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण करावे असेही आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी धुळे-नंदुरबार संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देऊन मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील विकास कामे व विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, महानगर प्रमुख मनोज मोरे, तालुका प्रमुख चंद्रकांत म्हस्के, पंकज मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीस साक्रीच्या आ.मंजुळा गावित, नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, डॉ.सुशिल महाजन, आधार हाके, शानाभाऊ सोनवणे, भुपेश शाह, भरत राजपूत, जि.प. सदस्य शालिनी बाळासाहेब भदाणे, साक्रीचे सभापती सुमित नागरे, महिला आघाडी संघटक संगीता जोशी, युवासेना जिल्हा युवाधिकारी पंकज गोरे, संजय गुजराथी, धीरज पाटील आदी पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.तुळशीराम गावीत यांनी केले.

मैत्रीतून नाती टिकतात

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी छेडला असता खा.राऊत म्हणाले मैत्री नेहमी घनिष्ठ केली पाहिजे. राजकारणाच्या पलिकडे असलेल्या मैत्रीतून नाती टिकतात असेही ते म्हणाले. पक्ष संघटनेत शितीलता येवू नये यासाठी आपण बांधणीच्या दृष्टीकोणातून दौरा करीत असल्यास त्यांनी केले.

काँग्रेस स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहे याबाबतही छेडले असता प्रत्येकाला आपापला मार्ग मोकळा आहे असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. मात्र ज्यांनी मागील वेळी सोशल मिडीयाचा वापर करुन सत्ता स्थापन केली. त्यांना आता जनता सोशल मिडीयातूनच जाब विचारत असल्यामुळे यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्नही केंद्राकडून होत असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले.

जगात महाराष्ट्राचे ठरले मॉडेल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर हाहाकार माजला असतांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय कुशलतेने राज्यात कोरोना सारख्या महामारीवर नियंत्रण मिळविले. नियोजनबध्द काम करीत राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे महाराष्ट्रचा जगात मॉडेल म्हणून गौरव झाला. उच्चन्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनीही गौरव केल्याचे खा.राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या