हे गद्दार सरकार असून...; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

हे गद्दार सरकार असून...; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई | Mumbai

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळेल. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहे. पण एक नक्की आहे. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. डाऊनरेट झाले आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळालेलं नाही.

सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे, असं मला वाटत नाही. म्हणून अशी गुंडगिरीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? गुंडगिरीची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकारणात कधीच नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छितात त्यांना हे मान्य आहे का? मी त्यांचा राजीनामा मागणार नाही. त्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल. महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे मोकाट फिरत असतील तर पुढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काय हाल होणार आहेत. यावरुन आपल्याला अंदाज येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com