अडगळीत पडलेल्या नेत्याचे वैफल्यग्रस्त भावनेतून वक्तव्य; अनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

अडगळीत पडलेल्या नेत्याचे वैफल्यग्रस्त भावनेतून वक्तव्य; अनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबई | Mumbai

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Shiv Sena former MP Anant Geete) यांनी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) सडकून टीका केली. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा (NCP) जन्म झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असे सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. अनंत गिते यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे (NCP leader Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेत अनंत गिते यांच्यावर पलटवार केला आहे.

सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हंटले आहे की, 'अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. गीते यांची अवस्था आता सांगताही येत‌ नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे'. तसेच, 'अनंत गिते यांचे आता वय झाले आहे. तसेच निवडणूकीतही पराभव झाला आहे. त्यामुळेच नैराश्यातून असे वक्तव्य आले असावे असेही तटकरे म्हणाले.

'पवार साहेब देशाचे नेते असुन आघाडीचे जनकही आहेत. ही आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे काम करत आहे. ज्या स्थितीमध्ये सरकार स्थापन झाले त्यामध्ये आघाडीचे जनकच पवार साहेब आहेत. त्यामुळेच हे सरकार उद्धवजींच्या नेतृत्वात सक्षमपणे काम करेल तसेच पुढची पाच वर्षे काम करेल' असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'शिवसेनेने पक्षाअंतर्गत काय समज द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेने या प्रकरणात भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. जेव्हा शिवसेनेवर चंद्रकांत पाटील टीका करत होते तेव्हा मात्र अनंत गीतेंनी पुढे येऊन काहीही बोलण्याचे धाडस दाखवले नाही. चंद्रकांत पाटील शिवसेनेवर हल्ला करत होते तेव्हा अनंत गितेंचा स्वाभिमान कुठे गेला होता' असाही सवाल त्यांनी केला.

अनंत गीते नेमकं काय म्हणाले?

राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर फक्त मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये... आघाडी आघाडीचं पाहून घेईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com