Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटीबद्ध व्हा - आ. विखे

शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटीबद्ध व्हा – आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे.

- Advertisement -

बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वांची जबाबदारी वाढली आहे.आगामी निवडणुका लक्षात घेऊन आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. राज्यात लवकरच सत्ता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र आ. विखे पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उतर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजीराव गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आ. विखे पाटील म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महिने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहीले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देऊ शकले नाही. महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल.

आगामी काळात नगरपंचायतीची असलेली निवडणूक लक्षात घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे. थोड्याच दिवसात राज्यात सता येईल आणि नगरपंचायतीवरही भाजपाचा झेंडा फडकेल, असे सुतोवाचही आ.विखे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या