शिंदेंना वर्षभरासाठीच मुख्यमंत्रीपद : दानवे

शिंदेंना वर्षभरासाठीच मुख्यमंत्रीपद : दानवे

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसकडील चर्चा आणि दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंना फक्त एक वर्ष मुख्यमंत्रीपदी राहायचा वायदा होता. एक वर्ष आता संपले आहे. त्यामुळे आता घरी जावे. हे आम्ही अधिकार्‍यांकडून, भाजप गोटातून आणि पत्रकारांकडून ऐकत आहोत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते सरकारमध्ये सामील झाल्यापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी अजित पवार केवळ उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत गेले नाहीत. याआधीही ते अनेकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत, असेही दानवे म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांना अटक होणार होती. वळसे-पाटील यांचे काय हेही सर्वांना माहीत आहे. हे सगळे नेते केवळ चौकशांना त्रासून गेले आहेत. अन्यथा ते कधीच कारागृहात गेले असते, असा दावा दानवे यांनी केला.

निरोपाची भेट : सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. शिंदे निरोपाच्या कार्यक्रमासाठी मोदी यांना भेटले असतील. सहकुटुंब सहपरिवार या आणि निरोप घेत सुखी राहा, असा सांगण्याचा हा कार्यक्रम होता की काय, मला कळत नाही, अशी टिपण्णीही सावंत यांनी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com